आज आणि उद्या महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. या घडामोडींचे परिणाम केवळ महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण देशावर होणार आहेत. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. इंडिया आघाडीच्या निवडणूक रणनीतीपासून ते आघाडीचा लोगो आणि संयोजकपदावर या बैठकीतच निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर इंडिया आघाडीकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची आज बैठक होत आहे. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या लोगोचे प्रकाशन होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच उद्या इंडिया आघाडीची सकाळीच महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात इंडिया आघाडीच्या पुढच्या स्टॅटेजीवर चर्चा होणार आहे. या बैठकीला एकूण 28 पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याने या बैठकीत कोणते निर्णय होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या संयोजक पदावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. संयोजकपदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर आहे. हे दोन्ही नेते या पदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. तर या पदासाठी शरद पवार यांच्या नावावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांचं नाव इंडिया आघाडीतील काही घटक पक्षाकडून पुढे केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार हे पद घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.