आशिया चषकाच्या सुपर 4 सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतीय संघ कोलंबोमध्ये पुढील सामन्याची तयारी करत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याची चर्चा सुरु आहे. भारतीय संघातील खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करत आहेत. रनमशीन विराट कोहलीने नेट्समध्ये सराव केला. यावेळी विराट कोहली याने श्रीलंकेतील युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे दिले. विराट कोहलीकडून श्रीलंकेच्या युवा खेळाडूंनी टिप्स घेतल्या. त्यामधीलच एका चाहत्याने विराट कोहलीला चांदीची बॅट गिफ्ट केली आहे. याचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत विराट कोहली श्रीलंकेच्या युवा खेळाडूंना टिप्स देताना दिसत आहे. एका श्रीलंकेच्या खेळाडूने विराट कोहलीचे कौतुक केल्याचेही दिसत आहे. या व्हिडीओला 4 हजार पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाईक्स केलेय. त्याशिवाय कमेंट्सचाही वर्षाव झालाय. विराट कोहलीला चांदीची बॅट गिफ्ट केल्याचाही या व्हिडीओत दिसतेय.
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सामना कोलंबो येथे रंगणार आहे. पावसामुळे दोन सप्टेंबरचा सामना रद्द करण्यात आला होता. आता भारत आणि पाकिस्तान सामन्याला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल लागेलच. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याचा सामना भारतीय संघ कसा करणार.. याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागलेय. टीम इंडिया सुपर 4 मध्ये पाकिस्तानशिवाय गतविजेता श्रीलंका आणि बांगलादेशविरोधात भिडणार आहे. आशिया चषकाची फायनल 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. पाकिस्तानविरोधातील सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी कसून सराव केला. सरावावेळी विराट कोहलीने स्थानिक खेळाडूंना टिप्सही दिल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.