मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला FRP पेक्षा 400 रुपये अधिक द्यावे. ते पैसे दसऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलीय. या प्रमुख मागणीसह विविध मांगण्यांसाठी उद्या (13 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावरील मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे 400 रुपये घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पैसे दिले नाहीतर आम्ही यावर्षी कारखान्याचं एकही धुराडं पेटवू देणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, माळेगाव सहकारी साखर कारखाना असेल यांची रिकव्हरी अकरा आणि साडेअकरा टक्के आहे. या कारखान्यांना जर 3300 आणि 3400 रुपयांचा दर देता येत असेल तर मग 13 टक्के रिकव्हरी असलेल्या कारखान्यांना दर देणं का शक्य नाही असा जाब आपण विचारला पाहिजे असे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं आपली ताकद दाखवली पाहिजे. त्याशिवाय कारखानदार पैसे देणार नाहीत आणि सरकार त्यांना पैसे देऊ देणार नाही असं राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं ज्याच्या घरी ऊस आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.
आपण लढलो तर आपल्या ऊसाच्या कांडीला सोन्याचा भाव येणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखर उद्योगामध्ये पुढील दोन वर्ष चांगलीच तेजी असणार आहे. त्यामुळं साखर कारखानदार नेहमीप्रमाणं आपली पिळवणूक करायला संघटीत झाले आहे. त्यामुळंआपण संघटीत होऊन लढलं पाहिजे असे राजू शेट्टी म्हणाले. मागचा साखरेचा गळीत हंगाम सुरू झाला त्यावेळी 3100 रुपये भाव होता. आता साखरेचे दर 3800 ते 3900 रुपये पर्यंत पोहोचले आहेत. सरासरी साखरेचा दर 3600 रुपये धरला तरी साखर कारखान्यांना टनाला 600 ते 700 रुपये जादा मिळणार आहेत. यातील शेतकऱ्यांना किमान 400 रुपये द्यावेत, अशी आमची मागणी असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
यावर्षी राज्यात पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया जात आहेत. कमी पावसामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील फटका बसला आहे. खताच्या वाढत्या किंमती, पाणी टंचाई यामुळे यावर्षी उसाचे उत्पादन घटणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं चांगले कारखाने जास्तीत जास्त 90 ते 100 दिवस चालू शकतील. अन्य कारखान्यांचा एक- दीड महिन्यातच गळीत हंगाम संपण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही होणार असल्याचे शेट्टी म्हणाले.