Tuesday, November 28, 2023
Homeराजकीय घडामोडीएकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार?

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार?

मागील जवळपास दीड वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल दिला आहे. संबंधित आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असं न्यायालयाने निकालात म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सुमारे चार महिने विधानसभा अध्यक्षांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. यावरून सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच विधानसभा अध्यक्षांना फटकारलं आहे.

विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्याच्या आत अपात्र आमदारांबाबत सुनावणी सुरू करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील, असं बोललं जात आहे. तसेच एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. या सर्व घडामोडींवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याच्या चर्चेबाबत विचारलं असता रामदास आठवले म्हणाले, “आतापर्यंत बरेचजण म्हणत होते, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद ‘खोक्यात’ आहेत, आता म्हणतायत ‘धोक्यात’ आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद अजिबात धोक्यात नाही.”

“ऑक्टोबर २०२४ ची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आरपीआय आम्ही सर्वजण मिळून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जागा निवडून आणू. आमच्यात कसलाही वाद अजिबात नाही. वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर राहणार आहेत,” असंही रामदास आठवलेंनी नमूद केलं.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र