शिक्षण खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक शिक्षकांची वयोमर्यादा संपत आल्याने दरवर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत आहे. मात्र, निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागांवर शिक्षक भरती केली जात नाही. त्यामुळे अनेक शाळांसमोर समस्या उभी ठाकली आहे.बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यात २०२२ पासून आतापर्यंत १९० शिक्षक निवृत्त झाले आहेत. मात्र, निवृत्त शिक्षकांच्या जागांवर नवीन शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे तिन्ही तालुक्यांत रिक्त जागांची संख्या वाढू लागली आहे.शिक्षण खात्याने जून २०२३ पर्यंत निवृत्त झालेल्या शिक्षकांची यादी दिली आहे. मात्र, त्यानंतरही गेल्या दोन महिन्यांत अनेक शिक्षक निवृत्त झाले आहेत.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सरकारी प्राथमिक शाळांमध्ये (Primary School) शिक्षकांच्या १७८६ तर माध्यमिक शाळांमध्ये २४० जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमध्ये इंग्रजी व इतर विषयांच्या जागा अधिक आहेत. या जागा लवकर भरती करणे गरजेचे आहे.राज्यात १५ हजार शिक्षकांच्या जागा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तरीही काही वर्षांपासून शिक्षक भरतीचा मुद्दा गंभीर बनला आहे. मात्र, अधिक प्रमाणात शिक्षक भरतीबाबत सातत्याने चालढकल केली जात असल्याने सर्वच शाळांना त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये मराठी, कन्नड व उर्दू माध्यमाच्या शाळा असून तिन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. गेल्या दीड वर्षात अधिक प्रमाणात शिक्षक निवृत्त होऊनदेखील जागा भरतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वर्षे शिक्षक भरती केली जात नसल्याने दरवर्षी रिक्त होणाऱ्या जागांची संख्या वाढत आहे.
खानापूर तालुक्यात मराठी माध्यमांच्या शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त आहेत.सौंदत्ती व बैलहोंगल तालुक्यात कन्नड शिक्षिकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त असून, या जागांवर दरवर्षी अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जात आहे. सरकारने राज्यात १५ हजार शिक्षकांच्या जागा भरती करण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानंतर शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. यावेळी राज्यात १३ हजार ५५२ शिक्षक भरतीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, या जागा कधी भरती होणार याबाबत काहीही अधिकृत माहिती नाही.