- गेल्या अनेक दिवसांपासून लंपडाव सुरु केलेल्या पावसाने मागील 48 तासात धुवाँधार हजेरी लावली आहे. मंगळवारी सायंकाळी आलेल्या पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला (Kolhapur Rain Update) झोडपले होते. बुधवारी दिवशी सुद्धा पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पावसाळा सुरु झाल्यापासून अपेक्षित पाऊस न झालेल्या शिरोळ तालुक्यातही पावसाची नोंद झाली.
बुधवारी सकाळपर्यंत सकाळी आठपर्यंत गेल्या 24 तासांत भुदरगड तालुक्यातील कडगाव, शिरोळसह पाच सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. धुवाँधार पावसाने पंचगंगा नदीवरील ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाने सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर हजेरी लावल्याने भात, सोयाबीन, भुईमूग पिकाला जीवदान मिळाले आहे. परतीची वेळ आली, तरी सप्टेंबर महिन्यात पाऊस नसल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सलग झालेल्या पावसाने दिलासा मिळाला.