महालक्ष्मीनगर येथील परिसरातील सुत रिवायडींग कारखान्यात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.
महालक्ष्मीनगर गल्ली नंबर ५ मध्ये राजेंद्र दाधूघोळ यांचा सुत रिवायडिंगचा कारखाना आहे. सोमवारी दुपारी त्यांनी जेवणासाठी कारखाना बंद केला. परंतु काही वेळानंतर त्यांच्या कारखान्यातून धुराचे लोट येत असल्याचे निदर्शनास येताच भागातील नागरिकांनी तातडीने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन गाडी पोहोचेपर्यंत कारखान्यात मोठ्या प्रमाणात सूताची बाचकी असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. अग्निशमन दलाचे जवान व परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर तीन तासच्या परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आले. तर घटनेची माहिती कळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत भागातील विद्युत पुरवठा बंद केला. या आगीमध्ये लाखो रुपयांचे सूत जळून खाक झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेची जुनी अग्निशमन गाडी तातडीने घटनास्थळी आली. परंतु या वाहनाची मुदत संपली असून घटनास्थळी आल्यानंतर या गाडीचा पंप नादुरुस्त असल्याने पाण्याचा मारा करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे महानगरपालिकेचीच दुसरी गाडी मागविण्यात आली. परंतु ही गाडीही घटनास्थळी आल्यानंतर तिचा गिअर अडकल्याने ही गाडी मागे-पुढे करता न आल्याने एकाच ठिकाणी थांबून राहिल्याने आग विझवताना अडथळा निर्माण झाला. अखेर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याची गाडी मागविण्यात आल्याची चर्चा घटनास्थळी ऐकावयास मिळत होती.