लिंबू चौक येथील खाद्यपदार्थ हातगाड्याची तोडफोड करत विक्रेत्याला मारहाण करण्याचा प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला. सदरचा प्रकार जुन्या वादातून तसेच दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नातून झाल्याची चर्चा भागात आहे. याप्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती. त्याबद्दल पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच असे वाढते प्रकार पोलिस खात्याने त्वरीत रोखावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून अधिक माहिती अशी की, लिंबू चौक येथे एका युवकाने हातगाड्यावर मॅगी कट्टा नावाचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास काही युवकांचा जमाव याठिकाणी आला. यावेळी जमावाने अचानकपणे या खाद्यपदार्थ विक्रेत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
खाद्यपदार्थ हातगाड्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. हातगाड्यावरील सिलेंडर, बाकडी, पाण्याचे कॅन, गॅस शेगडी, भांडी यांसह खाद्यपदार्थ विस्कटून रस्त्यावर फेकून देण्यात आले. दहशत करत जमाव तिथून जमाव चौकातून पसार झाला. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर प्रकाराची माहिती मिळताच काही काळाने घटनास्थळी पोलीस हजर झाले. मात्र याप्रकरणी जखमी खाद्यपदार्थ विक्रेत्याने तक्रार दिली नसून गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला नव्हता.