ताजी बातमी ऑनलाईन टीम
शासनाने राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या दोनच तालुक्यांचा समावेश केला असून अन्य दहा तालुक्यांवर अन्याय झाला आहे. शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यात करावा अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह जाधव यांनी केली आहे.
राज्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे या मूळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर झळ बसलेली आहे यावर्षी तर वेळेत पाऊस झालेला नाही तसेच त्याचे प्रमाणही कमी झाल्याने त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे याबाबत राज्य सरकारने पुन्हा विचार करणे आवश्यक आहे असे विजयसिंह जाधव यानी सांगितले.
श्री.जाधव म्हणाले, या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप पिकांवर अनिष्ट परिणाम झाला असून त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली तसेच ऊस पिकातही घट होणार आहे त्यामुळे
शेतकरी अक्षरक्ष: मेटाकुटीला आलेला आहे येणाऱ्या रब्बी हंगामावरही कमी पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मुळात अनेक तालुके डोंगरी व दुर्गम भागातील आहेत परंतु या तालुक्यात पावसाने दडीच मारल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे असे असताना शासनाच्या सर्व्हेमध्ये ठराविक तालुकेच दुष्काळग्रस्त धरले आहेत याचा शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे असे सांगितले.
वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांची अवस्था दयनीय आहे. सध्या भुईमूग, सोयाबीन पिकांची काढणी सुरू आहे. पन्नास टक्याहूनही अधिक उत्पादनांत घट झाली आहे ही वास्तवता असतानाही सर्व्हे करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्व्हे कशाप्रकारे केला? असाही प्रश्न श्री. जाधव यांनी करुन राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा समावेश करावा अन्यथा शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे पुन्हा सर्व्हे न झालेस आंदोलन करावे लागेल असा इशारा श्री. जाधव यांनी दिला आहे.