मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष व नेत्यांस गावात प्रवेश न देण्याचे फलक राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे व आमजाई व्हरवडे या दोन्हीही गावात झळकले आहेत. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे – पाटील यांना पाठींबा या डीजीटल फलकमधून दिला आहे. असे डिजिटल बॅनरच या दोन्हीही गावच्या वेशीवर झळकले आहे. राधानगरी-कोल्हापूर राज्यमार्गावर ही दोन्हीही गावे असल्याने सर्वांचे लक्ष ही डिजिटल बॅनर वेधून घेत आहेत.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून मराठ्यांचा ओ.बी.सी. मध्ये समावेश करावा, दर दहा वर्षांला आरक्षण दिलेल्या ओबीसींचा सर्वे करा, सर्वे करून प्रगत जाती आरक्षणातून बाहेर काढा, सारथीमार्फत पी. एच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देवून त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा ,आदी मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्या आहेत. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी, येथून पुढे सर्व निवडणूक मतदानावर मराठा समाजाचा बहिष्कार, आरक्षण न मिळाल्यास सकल मराठ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करणे आदी निर्णय गावच्या वेशीमध्ये लावलेल्या डिजिटल बॅनरवर नमूद करण्यात आले आहेत.