Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगऐन सणासुदीत महागाईचा विळखा; एलपीजीच्या दरांत 103 रुपयांची वाढ

ऐन सणासुदीत महागाईचा विळखा; एलपीजीच्या दरांत 103 रुपयांची वाढ

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून एलपीजीच्या दरांत (LPG Price) तब्बल 100 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder Rate) किमतींत ही वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतींत मात्र आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कमर्शियल सिलेंडरच्या दरांत वाढवण्यात आलेल्या किमतींचा प्रभाव खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येईल. म्हणजेच, आजच्या दरवाढीमुळे बाहेर खाणं तुमच्यासाठी महाग होणार आहे.

 

आज, 1 नोव्हेंबरपासून, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 1785.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1684 रुपये होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलेंडरची किंमत 1731.50 रुपये होती. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी 101.50 रुपयांनी महाग झाला आहे. कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 103.50 रुपयांनी वाढून 1943 रुपयांवर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात त्याचा दर 1839.50 रुपये झाला होता. तर चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1999.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1898 रुपये होते.

 

गेल्या महिन्यातही तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत 209 रुपयांनी वाढ करून लोकांना मोठा धक्का दिला होता. यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1731.50 रुपयांवर आली. सलग दुसऱ्या महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजीच्या किमतींत वाढ केली आहे.

 

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही

1 नोव्हेंबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि तो जुन्याच दरांवर कायम आहे. देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांवर नजर टाकल्यास, 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना मिळतो.

 

हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वापरतात. त्याचा घरगुती वापर करता येत नाही. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या वजनात फरक आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 19 किलो वजनाचा असतो आणि घरगुती एलपीजी सिलेंडर 14.2 किलो वजनाचा असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -