वर्षातला सर्वात मोठा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. परंतु यावर्षी दिवाळी न साजरी करण्याचा निर्णय नाशिकमध्ये सकल मराठा समाजाने घेतला आहे. आज नाशिकमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीमध्येच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नाशिक शहर आणि जिल्ह्यात एका ही घरात दिवाळी साजरी होणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवरच आज नाशिकमध्ये मराठा
समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध क्षेत्रातील, समुदायातील मंडळी उपस्थित होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बघता, तर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत काही मराठ्याच्या घरात दिवाळी साजरी केली जाणार नाही असा निर्णय करण्यात आला. या निर्णयाला आज बैठकीत सर्व मराठा बांधवांकडून पाठिंबा देण्यात आला.
सरकारकडे मराठा समाजाने आरक्षणाची तीव्र मागणी केली आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावात येऊ देणार नाही अशी भूमिका देखील मराठा बांधवांनी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजुला गेल्या 50 दिवसापासून नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाज साखळी उपोषण सुरू आहे. याठिकानी गेल्या 4 दिवसांपासुन आमरण उपोषणाला बसले आहेत. पार्श्वभूमीवरच आज शिवतीर्थावर मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी अनेक मराठा बांधव लोकप्रतिनिधी आणि इतर उपस्थित होते.