भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Bhogavati Sugar Factory Election) माघारीची प्रक्रिया एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे बिनविरोधची चर्चा आणि तिसरीकडे प्रत्येकाने आपापली ताकद आजमावण्याचे छुपे प्रयत्न सुरू केले आहेत.सत्ताधारी आणि विरोधी गटाकडूनही आपल्याला सोयीचे मित्र गट कसे मिळतील यासाठी चाचपणी सुरू ठेवली आहे. यामुळे सध्याचा रंग पाहता बिनविरोधची चर्चा आणि निवडणुकीची जुळवाजुळव हे प्रकार सुरू आहेत. भोगावती साखर कारखान्यासाठी माघारीची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर आहे. यानंतर रणधुमाळी सुरू होईल.त्यापूर्वी सर्वच पक्षांकडून बिनविरोधची भाषा पुढे आल्याने हा कारखाना बिनविरोध करून आर्थिक अडचणीतून काढण्यासाठी वक्तव्ये केली जात आहेत. सभासदांच्या संपर्क मेळाव्यामधून हा सरळ सूर आळविला जातानाच एकमेकाची उणीदुणी काढण्याचेही सुरू आहे. बिनविरोधसाठी एक बैठक झाली. त्यानंतर फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. मात्र छुप्या पद्धतीने प्रत्येकजण आपापली ताकद आजमावून समविचारी कसे जोडले जातील यासाठी हालचाल करू लागले आहेत.विद्यमान संचालक मंडळाकडून आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी आणि करवीर तालुक्यातील सभासदांचे मेळावे झाले. यानंतर कोल्हापूर येथे शहरवासीय सभासदांचा मेळावा झाला. दुसरीकडे विरोधकांनी सर्वपक्षीय एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी एकमेकांशी संधान साधले आहे. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, सदाशिवराव चरापले गट,भाजप, शेतकरी संघटना, शिवसेना यांचा समावेश आहे. मात्र राष्ट्रवादीचे धैर्यशील पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपला सावता सुभा ठेवला आहे