दिवाळी (Diwali) या सणानिमित्त प्रत्येक घरात लाडू हमखास तयार करतात. लाडू खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. दिवाळीत लाडू अनेक प्रकारचे केले जातात. शेव, बेसन, रव्याचे लाडू आवडीने खाल्ले जातात.
पण अनेकदा सोपे वाटणारे हे लाडू तयार करायला अवघड जातात. अनेकदा पाक नीट तयार होत नाही, किंवा लाडू नीट वळले जात नाही. ज्यामुळे लाडू फसतो आणि गृहिणीचा हिरमोड होतो.
रव्याचे लाडू चवीला तर भन्नाट लागतातच, पण लाडू तयार करताना नीट काळजीपूर्वक साहित्यांचा वापर करून लाडू तयार करावे लागतात. दिसायला आकर्षक, चवीला भन्नाट असा रव्याचा लाडू कसा तयार करायचा पाहूयात.
साहित्य
रवा
तूप
ड्रायफ्रुट्स
साखर
दूध
वेलची पावडर
कृती
सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये एक किलो रवा चाळून घ्या. नंतर फोडणीच्या मोठ्या पळीत २ ते ३ चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला सुका मेवा घालून भाजून घ्या. ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर एका मोठ्या कढईत चाळून घेतलेला रवा घालून भाजून घ्या. रवा भाजून घेत असताना २ ते ४ वेळा ५ ते ६ चमचे तूप घाला, व रवाळ तुपात रवा छान भाजून घ्या. रवा मध्यम आचेवरच भाजून घ्या. जेणेकरून रवा करपणार नाही. जर आपल्याला जास्त तूप आवडत असेल तर, आपण त्यात आणखी तूप घालून भाजू शकता. रवा भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा.
दुसऱ्या एका भांड्यात साखरेचा पाक तयार करा. यासाठी एक भांडं गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घालून मिक्स करा, व गॅस हाय फ्लेमवर ठेवा. साखर पाण्यात विरघळल्यानंतर त्यात २ चमचे दूध घालून मिक्स करा. पाक तयार झाल्यानंतर लगेचच भाजलेल्या रव्यावर ओतून घ्या, व चमच्याने मिक्स करा.
मिश्रण मिक्स केल्यानंतर त्यावर दीड ते २ तासांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून रवा साखरेचा पाक शोषून घेईल. दीड तासानंतर रवा पुन्हा चमच्याने ढवळून घ्या. नंतर त्यात एक चमचा वेलची पावडर, तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा. साहित्य मिक्स केल्यानंतर हाताला तूप लावा, व लाडू छान वळवून घ्या. अशा प्रकारे रव्याचे लाडू खाण्यासाठी रेडी. रव्याचे लाडू हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवल्यास महिनाभर आरामात टिकतात.