- दिवाळीसाठी अनेक जण गावी जात असतात. परंतु गावी जाणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीचा फटका बसणार आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जादा भाडे देऊन एसटीने प्रवास करणार आहे. एसटीने दिवाळी सणामुळे हंगामी भाडेवाढ केली आहे. रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यामुळे आता गावी जाण्यासाठी कोकणातील लोकांना एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यात दुपट्टीने वाढ करण्यात आली आहे. या सर्व भाडेवाढीमुळे चाकरमान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. एसटी परिवहन महामंडळाने रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवार मध्यरात्रीपासून एसटीची हंगामी भाडेवाढ लागू केली आहे. यामुळे आता रत्नागिरी ते मुंबई हा प्रवास ५० रुपयांनी महागला आहे.
राज्य परिवहन महामंडळाने हंगामी भाडेवाढ केल्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रत्नागिरी, मुंबई प्रवास भाडेवाढीमुळे ५० रुपयांनी महागला आहे. रत्नागिरीवरुन मुंबईला येण्यासाठी पूर्वी ५२५ रुपये मोजावे लागत होते. आता एसटीचे तिकीट ५७५ रुपये असणार आहे. तसेच रत्नागिरी- बोरिवली प्रवासासाठी ५५० ऐवजी आता ६०६ रुपये लागणार आहे. रत्नागिरी ते ठाणे प्रवास करताना आता ५०५ ऐवजी ५६० रुपये द्यावे लागणार आहे. राजापूर- मुंबईसाठी ५९५ रुपये लागत होते. त्यासाठी आता ६५५ रुपये द्यावे लागतील. तसेच लांजा बोरिवलीसाठी पूर्वी ५५७ रुपये तिकीट होते. आता ते ६३५ रुपये झाले आहे.
दिवाळीच्या सुट्टीमुळे अनेक जण कोकणात पर्यटनासाठी येतात. एसटीने ७ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर पर्यत 10 टक्के दरवाढ लागू केली आहे. त्याचा फटका कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही बसणार आहे. यापूर्वी आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही भाडेवाढीतील फरक द्यावा लागणार आहे.
ऐन दिवाळीत सर्वसामान्य लोकांचे भाडेवाढीमुळे दिवाळे निघणार आहे. दिवाळीत एसटीकडून १० टक्क्यांची हंगामी भाडेवाढ केली आहे. परंतु खासगी बसचालकांकडून अवाच्यासव्वा प्रवास भाडे आकारले जात आहे. अनेक शहरात दुप्पट भाडे खासगी बसचालक घेत आहे. परंतु जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसचालकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.