शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिलेल्या आश्वासनावर सडकून टीका केली. अमित शाह मध्य प्रदेशात भाजपा सरकार आल्यास मोफत रामलल्ला दर्शनाचं आश्वासन देत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. तसेच भाजपाचा पराभव झाल्यास पैसे घेणार का? असा सवाल केला. मोदी सरकारने रामलल्लांवरही कर लावल्याचाही आरोप राऊतांनी केला. ते मंगळवारी (१४ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “अमित शाह मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आल्यास नागरिकांना मोफत रामलल्लांचं दर्शन करण्यास नेण्याचं आश्वासन देत आहेत. हे मोफत, ते मोफत असं भाजपाचं सुरू होतं. आता रामलल्लाही मोफत असं झालंय. रामलल्ला देशाचे आणि संपूर्ण विश्वाचे आहेत. मात्र, ते निवडणूक प्रचारात रामलल्लांचा वापर करत आहेत. याचा अर्थ मध्य प्रदेशच्या जनतेने भाजपाला पराभूत केलं, तर रामलल्लांच्या दर्शनाला गेलेल्या मध्य प्रदेशच्या नागरिकांना अडवणार का?”
“भाजपाला मतदान दिलं तर रामलल्लांचं दर्शन मोफत, नाहीतर पैसे”
“भाजपाला मतदान दिलं तर रामलल्लांचं दर्शन मोफत, नाहीतर पैसे द्यावे लागतील, दर्शन देणार नाही, असं राजकारण देशात सुरू आहे. रामलल्लांवरही मोदी सरकारने कर लावला. औरंगजेबाच्या काळात धार्मिक गोष्टींवर जिझिया कर लावला जायचा. आता भाजपाने रामलल्लांवर कर लावला. यासाठी भाजपाने माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.भाजपा रामलल्लांची मालक झाली आहे का?”
“निवडणूक प्रचारात भाजपा नेत्यांकडून अशी वक्तव्ये होत आहेत. भाजपा रामलल्लांची मालक झाली आहे का? की रामलल्लांनी भाजपाला नियुक्त केलंय? हा फार गंभीर मुद्दा आहे. निवडणूक आयोग खरंच जीवंत असेल, तर त्यांनी या मुद्द्यावर भाजपावर कारवाई करायला हवी,” असं आव्हान संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं.