मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी कंबर कसली असून आरक्षण मिळत नाही तोवर शांत न बसण्याचा त्यांनी निर्धारच केला आहे. त्यामुळे उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याची रणनीती आखली आहे. सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून तोपर्यंत त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा निश्चय केलाय. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील दिवाळी साजरी करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसंच, त्यांच्या घरातही दिवाळीची रोषणाई झाली नसल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी म्हणाल्या की, मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत, त्यासाठी त्यांचा अभिमान आहे. आम्ही दिवाळी साजरी केली नाही आणि करणारही नाही. ते २४ डिसेंबरला घरी येतील तेव्हाच दिवाळी साजरी करणार. ज्या मराठा बांधवांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत.
तसंच, “सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं, म्हणजे ते लवकर घरी येतील आणि २४ डिसेंबरला आम्ही दिवाळी साजरी करू. दिवाळीत ते घरी असायला हवे होते, असं वाटतंय. आरक्षण मिळालं असतं तर ते घरी असते”, असंही त्या पुढे म्हणाल्या.
“मराठा आरक्षण मिळालं नाही, मराठा बांधवांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे पप्पांनी सांगितलं आहे की आनंद साजरा करणार नाही. त्यामुळे आम्हीही दिवाळी साजरी केली नाही”, असं मनोज जरांगे पाटलांची मुलगी पल्लवी पाटील म्हणाली.
तर मनोज जरांगे पाटलांचा मुलगा शिवराज म्हणाला की, आमच्या भावना दुःखद आहेत. आमच्या समाजाला अद्यापही आरक्षण मिळालेलं नाही. आमच्या समाजातील लोकांनी बलिदान दिलं आहे, त्यामुळे त्याचं दुःख आहे. समाजाला आरक्षण मिळेल त्यादिवशी आमची मोठी दिवाळी असेल आणि तोच आमच्यासाठी आनंदाचा दिवस असेल.
२० नोव्हेंबरला कल्याण दौरा
मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील येत्या सोमवारी (२० नोव्हेंबर) कल्याणमध्ये येणार आहेत. मराठा समाजाच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांची कोळसेवाडी भागात पोटे मैदानावर जाहीर सभा होणार आहे.