कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बहुतेक कारखाने बंद आहेत. ४०० रुपये घेण्याचे आंदोलन आता अंतिम आहे. शेतकऱ्यांनो, ऊसतोड घेऊ नका. घेतील त्यांना इंगा दाखवा. फक्त आठ दिवस थांबा. हे सगळे साखर कारखानदार गुडघे टेकतील, असे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्पष्ट केले.आक्रोश यात्रा आणि ठिय्या आंदोलनानंतरही शासन आणि कारखानदार तोडगा काढण्यास पुढाकार घेत नसल्याने तुरंबे (ता. राधानगरी) येथील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात पुढील रणनीती ठरवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे (Swabhimani Shetkari Sanghatana) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील एफआरपी एकरकमी घेऊ शकलो. गेल्यावर्षी हंगाम संपला. मात्र, साखर विक्री झाली नाही. साखरेचे दर वाढले, विक्री झाली. मग आता तुम्ही त्याचा मोबदला द्यायला का कारकूर करता? पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कसे पैसे देता येतात याचा हिशेब सांगितला तर त्यांनी देता येत नाही अशी भूमिका घेतली; पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही. अजून एक महिना शेतकरी थांबायला तयार आहे. त्यामुळे कारखानदारानी शेतकऱ्यांच्या खांद्यावर हंगाम देऊ नये. तुटलेला ऊस नेताना जर नुकसान झाले तर कारखान्यानी द्यावे असे लिहून घ्या.’
स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील म्हणाले, ‘अभ्यासपूर्ण निकषांवर मागण्या करूनही शासन मध्यस्थी करायला अजून तयार नाही. पुढच्या आठ दिवसांत आंदोलन नेटाने सुरू ठेवावे लागेल.’ अजित पोवार म्हणाले, ‘कष्टाने उभ्या केलेल्या पिकाला उच्चांकी भाव मिळवण्यासाठी शेतकरी संघटित व्हायला पाहिजे.’संतोष बुटाले, वसंत चव्हाण, जनार्दन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. भागोजी कांबळे, सागर शंभूशेट्ये, सचिन शिंदे, एस. व्ही. पाटील, इंद्रजित भारमल, शरद मुसळे उपस्थित होते. पांडुरंग जरग यांनी स्वागत केले. सरदार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच आनंदा घारे यांनी आभार मानले.