शहरातील पत्रकारनगर येथील गणेश कॉलनीतील ऑनलाईन वस्तू पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातून १४ लाख ७५ हजार ४०२ रुपयांची रोकड लंपास करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.कंपनीतच डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्याने ही रकमेवर डल्ला मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. गणेश नागेश मदने (वय ३०, रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, शंभर फुटी परिसर, सांगली ) असे संशयिताचे नाव आहे.
शहरातील पत्रकारनगर येथे ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या कंपनीचे इन्स्टाकार्ट सव्ह’सेस नावाने कार्यालय आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास या कार्यालयात प्रवेश करून चोरट्याने १४ लाख ७५ हजार ४०२ रुपयांची रोकड लंपास केली होती. यानंतर विद्यानंद रविंद्र कामत यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.
एलसीबीचे पथक गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली की, या कार्यालयातून रोकड संशयित मदने याने लंपास केली असून तो शंभर फुटी रस्ता ते उष:काल रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार आहे. पोलिसांनी या परिसरात सापळा लावला असता, दुचाकीवरुन तो या परिसरात थांबला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी त्याला हटकले असता, तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला ताब्यात घेण्यातआले.
यानंतर त्याने मंगळवारी रात्री मित्राची दुचाकी घेवून ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीची सर्व रोकड त्याच्या घरातून हस्तगत केली. एलसीबीचे निरिक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक पंकज पवार, अमर नरळे, विक्रम खोत, अनिल कोळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.