मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 15 नोव्हेंबरअखेर 67 लाखांवर अभिलेख्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 12 हजारहून अधिक कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले. कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अजय पवार काम पाहात आहेत.
विशेष कक्षांमार्फत 15 नोव्हेंबरअखेर एकूण 67,46,270नोंदींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण 12 हजार 803 मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा कारागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय, मुद्रांक कार्यालय, भूमिअभिलेख, सैनिक कल्याण कार्यालय, महापालिका जन्म-मृत्यू रजिस्टर, नगरपालिका प्रशासन, उपवनसंरक्षक कार्यालय अशी 11 शासकीय कार्यालयांतील विविध अभिलेखे, तसेच 19647 पूर्वीचे अधिकारी, कर्मचारी यांचे सेवापुस्तक-सेवा अभिलेखे तपासण्यात आले. यामध्ये महसूल विभागांतर्गत 10 तहसील कार्यालये व १ अपर तहसील कार्यालयाच्या 22 43 918 नोंदी तपासण्यात आल्या. यामध्ये 9731 नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या. अन्य कार्यालयांतून 45,2,352 नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये 3072 नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या आहेत.