शामरावनगर येथील ज्ञानेश्वर कॉलनीतील शोषखड्ड्यात बुडून दोनवर्षीय चिमुरडीचा (Child Girl) दुर्दैवी अंत झाला.तहुरा राजू मुलाणी असे मृत बालिकेचे नाव आहे. ही दुर्घटना काल (शनिवार) सकाळी अकराच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती मिळताच शहर पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, एकुलत्या मुलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. दरम्यान, परिसरात सुरू असणाऱ्या गटाराच्या कामातील दिरंगाईचा हा बळी असल्याने प्रशासनाविरोधात आक्रोश करण्यात आला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मृत बालिका तहुरा ही दोन वर्षांची आहे. कुटुंबीयांसमवेत शामरावनगरमखील असणाऱ्या ज्ञानेश्वर कॉलनीत राहत होती. राजू मुलाणी यांना तहुरा ही एकुलती मुलगी होती. आज सकाळी अकराच्या सुमारास तहुरा घराबाहेर एकटीच खेळत होती. घरातील सर्वजण कामात व्यस्त होते. महापालिका प्रशासनाने शामरावनगरमध्ये गटाराचे काम सुरू केले आहे. ज्ञानेश्वर कॉलनीत कंत्राटदाराने शोषखड्डा बांधला आहे. मात्र, त्यावर ये-जा करण्यासाठी काहीच टाकले नव्हते, त्यामुळे हा खड्डा उघडाच होता. गटाराची खोलीदेखील अधिक असल्याने याच्यावरून ये-जा करताना रहिवाशांना तारेवरची कसरत करावी लागते.
दरम्यान, आज सकाळी तहुरा घराबाहेर खेळत असताना ती या गटरामध्ये पडली. खोली अधिक असल्याने आणि त्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ती खाली गेली. नातेवाइकांनी ती कोठे दिसत नसल्याने शोध सुरू केला. याचवेळी त्यांच्या नातेवाइकांना तहुराचा ड्रेस गटारीत तरंगताना आढळला. यानंतर रहिवाशांनी नजीक जाऊन पाहिले असता ती गटारात मृतावस्थेत आढळून आली. हे पाहिल्यानंतर नातेवाइकांनी मोठ्याने आक्रोश केला.
परिसरातील रहिवाशांनी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील तपासणीसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. चिमुकलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.