Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगअवकाळी संकट कायम! पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली

अवकाळी संकट कायम! पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली

 

 

डिसेंबर महिन्यातही अवकाळी पावसाची हजेरी (Rain Updates) कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं लवकरच चक्रीवादळात (Cyclone) रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या तापमानावर परिणाम होणार आहे. राज्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरुच असल्याने बळीराजा मात्र संकटात सापडला आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि वेस्टर्न डिस्टर्बनसमुळे राज्यात पुढील 24 तासांत काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला आहे.

 

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडी (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा धोका

दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ‘मिचॉन्ग’ (Cyclone Michaung) चक्रीवादळाचा धोका आहे. मात्र, हे संभाव्य वादळ देशाच्या दक्षिण भागात धडकणार आहे. पण त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. चक्रीवादळ मिचॉन्ग सोमवारी पहाटे पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. उत्तर तामिळनाडू आणि शेजारील दक्षिण आंध्र प्रदेशातील किनारपट्टी जिल्हे सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) अद्याप हे वादळ नेमके कोठे धडकेल हे सांगितलेले नाही.

 

मुंबईत थंडीचा कडाका कायम राहणार

मुंबईत गुलाबी थंडीचे आगमन झालं आहे. डिसेंबरमध्ये मुंबईत गारठा वाढणार आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदा मुंबईत किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग चक्रीवादळ तयार झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील तापमानात पुन्हा वाढ होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील चार ते पाच दिवस मुंबईत थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात घट झाली असून, पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातही तापमान 15 अंशांच्या खाली गेलं आहे. अवकाळी पावसामुळे राज्याच्या विविध भागात तापमानात घट होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -