माजी खासदार राजू शेट्टींसह (Raju Shetti) 150 जणांवर इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील जयंत पाटील (Jayant PatilP यांच्या राजारामबापू कारखान्यावर दोन दिवसांपूर्वी ऊस दरासाठी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, ऊस दर आंदोलनावरुन 10 तास कारखाना बंद पाडून लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
ऊस दराच्या प्रश्नावरून शेट्टी यांनी इस्लामपूरमधील राजारामबापू कारखाना येथे 1 डिसेंबर रोजी सकाळी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत कारखान्याच्या वजन काट्याच्या समोरील मोकळ्या जागेत आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. आंदोलनाच्या दहा तासांच्या काळात कारखान्याचे आर्थिक नुकसान व्हावे या उद्देशाने गाळप बंद पाडले. ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार तसेच कारखान्याचे साखर, इथेनॉल उत्पादन, डिस्टिलरी व को-जनरेशन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हणून कारखान्याचे सचिव दिलीप महादेव पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून राजू शेट्टी, भागवत जाधव, महेश खराडे, संदीप राजोबा, अॅड. शमशुद्दीन संदे, रविकिरण माने, संतोष शेळके, राजेंद्र माने, स्वास्तिक पाटील, सूर्यकांत मोरे, काशीनाथ निंबाळकर, प्रभाकर पाटील, संजय बेले, आप्पासाहेब पाटील, जगन्नाथ भोसले, बाबासाहेब सांद्रे, शिवाजी पाटील, राम पाटील, अनिल काळे, रवींद्र दुकाने अशा 20 जणांसह 125 ते 150 कार्यकर्त्यांच्या जमावाविरुद्ध इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, सरकारच्या डोक्यात राजकारण आहे. जाहिरातबाजी करणे या पलीकडे काहीच करत नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत याबाबत कोणीच काही बोलत नाही. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, कापूस या भांडवली गुंतवणूक असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे, असे असताना सरकार हातपाय हलवायला तयार नाही. दोन-चार हजार रुपये देणार असतील तर शेतकरी उभा राहणार नाही.
कारखाना प्रशासनासोबत स्वाभिमानीची बैठक फिस्कटली
दरम्यान, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी राजारामबापू साखर कारखाना प्रशासनासोबत स्वाभिमानीची बैठक फिस्कटली आहे. राजारामबापू साखर कारखान्याकडून 3100 रुपये पहिली उचल आणि गत हंगामातील 50 रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, रिकव्हरी रेटप्रमाणे पहिली उचल 3200 रुपये देण्याच्या मागणीवर राजू शेट्टी यांनी ठाम भूमिका घेतली आहे.