अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी गुरुवारी गुजरातमधील कच्छमध्ये बांधण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी पार्कचा फोटो शेअर केला आहे.ग्रीन पार्क प्रकल्पाविषयी माहिती देताना अदानी म्हणाले की, या प्रकल्पात 726 चौरस किलोमीटरचा मोठा परिसर आहे. त्यातून 30 GW वीजही निर्माण होणार आहे. हे अंतराळातूनही दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गौतम अदानी म्हणाले “ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा अभिमान वाटतो. आम्ही जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क बनवत आहोत. वाळवंटात 726 चौरस किमी व्यापलेला हा प्रकल्प अवकाशातूनही दिसतो. आम्ही 30GW वीज निर्माण करू. आम्ही 2 कोटींहून अधिक लोकांना रोजगार देणार आहोत.”
अदानी पुढे म्हणाले की, याशिवाय मुंद्रा येथून फक्त 150 किमी अंतरावर आम्ही सौर आणि पवन ऊर्जेसाठी जगातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादन करणारी इकोसिस्टम तयार करत आहोत. शाश्वत ऊर्जेच्या दिशेने भारताच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
अदानी समूहाच्या या प्रकल्पामुळे भारताची हरित ऊर्जा क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. 2021 मध्ये COP26 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख केला होता. 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करेल, असे ते म्हणाले होते.अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ
दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून अदानी समूहाचे शेअर्स तेजीत आहेत. अदानी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे.