Thursday, May 30, 2024
Homeकोल्हापूरअ ब ब.. मुंडके भाजून खाल्ल्याच्या बाता; पोलिस यंत्रणा हडबडली

अ ब ब.. मुंडके भाजून खाल्ल्याच्या बाता; पोलिस यंत्रणा हडबडली

सर्जू नावाच्या चालकाचा खून करून त्याचे मुंडके काही जण खात असल्याच्या बाता एकजण मारत होता. हे ऐकणार्‍यांनी संबंधिताला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांसमोरही त्याने उजळाईवाडी येथे असा प्रकार घडल्याचे सांगितले. पोलिसांनी याची खातरजमा करण्यासाठी थेट घटनास्थळ गाठले. यावेळी ज्याच्या खून झाल्याचे सांगण्यात येत होते, तोच व्यक्ती समोर आल्याने पोलिसांनी नि:श्वास टाकला. या बाता मारणार्‍या कृष्णा रविदास (वय 30, रा. झारखंड) याने नशेमध्ये हा प्रकार केल्याचे समोर आले.

उजळाईवाडीतील एका गॅरेजवर काही परप्रांतीय कामगार राहण्यास आहेत. त्यापैकीच एक कृष्णा रविदास आहे. बुधवारी रात्री येथे नशेमध्ये तो धिंगाणा करू लागल्याने मालकाने त्याला त्याच्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ सोडले. या ठिकाणाहून तो फिरत रंकाळा परिसरात गेला. येथे एका इमारतीबाहेर असणार्‍या वॉचमनला त्याने उजळाईवाडीत सर्जू नावाच्या कामगाराचा खून करून काही जण मुंडके भाजत असल्याचे सांगितले. यावेळी त्या वॉचमनने याची माहिती आपल्या काही सहकार्‍यांना दिली. त्यांनी संबंधिताला पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले. यामुळे सर्व जण कृष्णा रविदास याला घेऊन जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आले.

जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासमोरही त्याने हाच प्रकार सांगितला. नाळे यांनी वरिष्ठांना माहिती कळवीत घटनेची खातरजमा करण्यासाठी घटनास्थळ गाठले. याठिकाणी चौकशी सुरू असताना ज्याचा खून करण्यात आला; असे रविदास सांगत होता, तो सर्जू नामक तरुण समोरच आला. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर कृष्णा रविदास याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तो नेहमी नशेत असे प्रकार करत असल्याचे समोर आले. त्याला गोकूळ शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -