देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) दीर्घकाळ स्थिर आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत अनेक चढ-उतार झाले असले तरी, भारतात तेलाच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. आता नवं वर्ष 2024 जवळ येऊन ठेपले आहे आणि पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आणखी दिलासा मिळणार का? किंवा पेट्रोल-डिझेल महाग होणार का? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतींत सतत होत असलेली घसरण दिलासा देणारे संकेत देत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उताराचा भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर कसा परिणाम होतो, जाणून घेऊयात सविस्तर…
पेट्रोल-डिझेल 588 दिवसांपासून स्थिर
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या सध्याच्या किमतींबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 589 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यांच्या किमतीतील शेवटचा बदल मे 2022 मध्ये दिसून आला. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतींनी प्रति बॅरल 90 डॉलर्सचा टप्पा ओलांडला, पण पेट्रोल आणि डिझेल स्थिर राहिले, देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे त्यांच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असं अनेक अहवालात म्हटलं आहे. आता कच्च्या तेलाच्या किमती सातत्यानं 80 डॉलर प्रति बॅरलच्या खाली घसरून 79.07 वर आल्यानं नव्या वर्षात इंधनाच्या दरात आणखी दिलासा मिळण्याची आशा आहे.