लहान मुलं अनेकदा बटाटा आणि फ्लॉवरची भाजी खाण्यास खूप कंटाळतात. ही भाजी शाळेच्या टिफिनमध्ये दिल्यानंतर काहीवेळा ती परत घरी घेऊन येतात. यात हल्ली बाजारात फ्लॉवर स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेकांच्या घरात आठवड्यातून दोनदा तरी फ्लॉवर बटाट्याची भाजी बनते. अशावेळी लहानांनाच काय मोठ्यांनाही ती खाऊन कंटाळा येतो. पण, आज आम्ही तुम्हाला फ्लॉवर बटाट्यापासून तयार होणारी एक हटके आणि चविष्ट रेसिपी सांगणार आहोत. आज फ्लॉवर आणि बटाट्यापासून व्हेज कबाब कसे बनवायचे हे पाहणार आहोत. अगदी चविष्ट आणि पौष्टिक असे हे कबाब तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता. विशेष: म्हणजे लहान मुलंदेखील ते आवडीने खातील. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ…
फ्लॉवर बटाटा कबाबसाठी लागणारे साहित्य
१) फ्लॅावर ३०० ग्रॅम
२) हिरवी मिरची – २/३
३) आलं, लसूण – २ टीस्पून (पेस्ट)
४) जिरं – १ टीस्पून
५) चाट मसाला – २ टीस्पून
६) मीठ – चवीनुसार
७) हळद – ½ टीस्पून
८) लाल मिरची पावडर – १ टीस्पून
९) कोथिंबीर – गरजेनुसार
१०) उकडलेले बटाटे – १ कप / २५० ग्रॅम
११) चीज – ¼ कप
१२) भाजलेले बेसनाचे पीठ – २ टीस्पून
१३) तेल – गरजेनुसार
फ्लॉवर बटाटा कबाब बनवण्याची कृती
सर्वप्रथम फ्लॉवर स्वच्छ धुवून किसणीने बारीक किसून घ्या. यानंतर बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं, चाट मसाला, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, हळद, बारीक कोथिंबीर आणि उकडून बारीक करून घेतलेले बटाटे मिक्स करा. तुम्ही आवडीनुसार चीज टाकू शकता. यानंतर बेसन पीठ टाकून सर्व मिश्रण चांगल्याप्रकारे एकजीव करून घ्या. आता तयार मिश्रणापासून कबाब तयार करा, त्यानंतर ते तुम्ही पॅनवर फ्राय करू शकता किंवा तेलात तळूही शकता. अशाप्रकारे तयार झाले तुमचे फ्लॉवर बटाटा कबाब. हे तुम्ही हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.