एसटी महामंडळाच्या विविध सवलतधारी प्रवाशांना महामंडळाच्या ताफ्यातील बसेसमध्ये आसन व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी पासून नवीन आसन व्यवस्था लागू करण्यात येणार असून विधिमंडळ सदस्यांना आता साध्याबस मध्ये १, २ ऐवजी ७, ८ आसन राखीव करण्यात आली आहे.
त्याप्रमाणेच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, महिला, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, एसटी कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्था सुद्धा बदलण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये विविध सामाजिक घटकांना सेवा प्रकारनिहाय सवलत दिल्या जाते. ज्यामध्ये साधी, निमआराम, विनावानानुकूलित शयनआसनी, शिवशाही आसनी, मिडी, वातानुकूलित, व्होल्वो, शिवाई, विनावातानुकूलित शयनयान, मध्ये राखीव आसने उपलव्ध करुन दिलेली आहेत. तसेच सेवा प्रकारामध्ये विविध आसनक्षमतेच्या बसेस चालनासाठी उपलब्ध आहेत.सध्या स्थितीमध्ये एसटी महामंडळात नव्याने ईटीआयएम-ओआरएस कार्यप्रणाली कार्यान्वित झालेली आहे. जुन्या कार्यप्रणालीमध्ये बसेसचे वेगवेगळं सीट लेआऊट उपलब्ध आहेत. तसंच बस प्रकारानुसार विविध सामाजिक घटकांना विविध बसेसमध्ये आसन क्रमांक देखील वेगवेगळे आहेत.
त्यामुळे प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. सदर तक्रारी निर्माण होऊ नयेत याकरीता आसन व्यवस्थेमध्ये एकसुत्रता आणण्याकरीना एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.
आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलबजावणी १ जानेवारी पासून करण्यात येणार आहे. तसंच वाहनातील आसन क्रमांक बदलण्याची कार्यवाही यंत्र अभियांत्रिकी खात्यातर्फे स्टिकर्स लावून करण्यात येत असून पुर्वीचे आसन क्रमांक व सुधारित आसन क्रमांक यात तफावत असल्यामुळे प्रवासी तक्रारी उद्भवू शकतात.
त्यामुळे प्रवाशांच्या माहितीकरीता नवीन आसन व्यवस्थेनुसार आरक्षणाची कार्यपध्दती अमलांत येईपर्यंत सर्व बसस्थानकावर वाहन प्रकारनिहाय आसन क्रमांकांचे पुर्वीचे व नवीन सुधारणासह तक्ते फलकावर प्रदर्शित करण्याच्या सूचना सुद्धा एसटी प्रशासनाने विभाग नियंत्रकांना दिले आहे.