ताजी बातमी / online team
तिसर्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना काल मंगळवारी इचलकरंजी परिसरात घडली .
आरपी रोडवरील जैनको टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन अमर विलास साळुंखे (वय ४३ रा. कोरोची) याने आत्महत्या केली. सदरची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, अमर साळुंखे हा गेल्या दहा वर्षांपासून मानसिक रुग्ण होता. तो आईसमवेत कोरोची (ता. हातकणंगले) येथे राहण्यास होता. मिळेल ते काम करुन तो आपला उदरनिर्वाह चालवत होता. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जैनको टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर जावून तेथून त्याने खाली उडी घेतली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलवरुन पोलिसांनी साळुंखे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर मृताची ओळख पटली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रथमतः गावभाग पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहिती घेत असताना ही हद्द शिवाजीनगर पोलिस ठाण्याची असल्याचे समजल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान या घटनेने परिसरात हळ हळ व्यक्त केली जात आहे.