काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यादरम्यान काही महिन्यांपूर्वी काढलेली भारत जोडो यात्रा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती.लोकसभा निवडणुकीपूर्वी या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याबाबत आता अखेर काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी अधिकृत घोषणा केली असून या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला “भारत न्याय यात्रा” असं नाव देण्यात आलं आहे. १४ जानेवारीला मणिपूरपासून सुरू होणाऱ्या या यात्रेचा शेवट २८ मार्च रोजी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत होणार आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा दक्षिण भारतातून सुरू होऊन उत्तर भारतात संपला होता. आता दुसऱ्या टप्प्यात भारताचा पूर्व ते पश्चिम भाग सामावून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. याच मणिपूरमधून राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा सुरू होईल. या यात्रेचा समारोप लोकसभेच्या सर्वाधिक जागांमध्ये उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात होणार आहे.
दरम्यान, काँग्रेसचा उद्या स्थापना दिवस असून या औचित्यावर काँग्रेसने नागपुरात महासभेचंही आयोजनकेलं आहे. या सभेला “हैं तैयार हम” असं नाव देण्यात आलं असून या सभेच्या माध्यमातून काँग्रेसकडून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे.