भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे वर्चस्ववादातून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटांतील पाच ते सहा जण जखमी झाले. ही घटना काल सकाळी घडली. दरम्यान, विजय जालिंदर कुंभार (वय २६) याला मारहाण केल्याप्रकरणी पेठवडगाव पोलिस ठाण्यात (Pethvadgaon Police Station) सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये अभिजित सर्जेराव माने, संग्राम बाळासाहेब माने, बाळासाहेब दिनकर माने, सुशांत संजय पाटील, रोहन किरण कांबळे, करण माने (सर्व रा. माळवाडी, भेंडवडे) यांचा समावेश आहे.
दरम्यान, या घटनेचे पडसाद काल सकाळी उमटले. दोन्ही गट आमने-सामने आल्याने काठ्या व शस्त्रांचा वापर झाल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. एक मोटारसायकल पेटविली असून दुसऱ्या गाडीवर दगड टाकून मोडतोड केली आहे. गावात तणावपूर्ण वातावरण असून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.जयसिंगपूर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक रोहिणी सोळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून दीड वर्षे झाले येथील सर्जेराव माने व अमोल निकम गटात वर्चस्ववादातून धुसफूस सुरू होती. त्यांचे पडसाद उमटून काल रात्री निकम गटाच्या एकास मारहाण झाली., झालेल्या मारहाणीत निकम गटाच्या बालाजी निकम व संतोष निकम यांच्यावर शस्त्राने हल्ला झाला.
तसेच माने गटाच्या छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे (Rajaram Sugar Factory) माजी अध्यक्ष सर्जेराव माने व अन्य दोघांना मारहाण झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.