कवलापूर (ता. मिरज) येथे एका 34 वर्षीय विवाहितेला विविध प्रकारची आमिषे दाखवून सव्वा वर्षापासून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी विकास विश्वास तावदरकर (वय 34, रा.नलावडे गल्ली, कवलापूर) याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित महिला मूळची मिरज तालुक्यातील आहे. ती सध्या पतीसोबत कवलापूर येथे राहते. ऑक्टोबर 2022 मध्ये तिची संशयित तावदरकर याच्याशी ओळख झाली. पीडित महिलेवर त्याने विविध प्रकारची आमिषे दाखवून तिच्या घरात, स्वत:च्या कारमध्ये त्याने अनेकदा बलात्कार केला.
जयसिंगपूर (ता. शिरोळ), कुर्डूवाडी (ता. पंढरपूर) येथे हॉटेलमध्ये नेऊन, तसेच काननवाडी (ता. मिरज) येथेही तिच्यावर बलात्कार केला. तो सातत्याने शरीरसुखाची मागणी करू लागला. त्यामुळे तिने हा प्रकार पतीला सांगितला. पतीने त्याला ‘माझ्या पत्नीचा नाद सोड’, असे सांगितले. त्यावेळी त्याने पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याने पीडित महिलेचा पाठलाग सोडला नाही.
अखेर महिलेने पतीची मदत घेऊन गुरुवारी सांगली ग्रामीण पोलिस ठाणे गाठले व तावदरकरविरुद्ध फिर्याद दाखल केली. बलात्कार व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. आज, शुक्रवार, दि. 12 जानेवारीला त्याला न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.