केंद्र सरकारने भारतात 5G लाँच केल्यानंतरच 6G तंत्रज्ञानावर काम सुरू केलं होतं. मात्र, आता यासोबतच क्वांटम आणि आयपीआर या गोष्टींच्या रिसर्चसाठी देखील केंद्राने प्रस्ताव मागवले आहेत.या प्रस्तावांसाठी दूरसंचार सचिव नीरज मित्तल यांनी मंगळवारी ‘भारत 5G पोर्टल’ लाँच केलं.
हे पोर्टल म्हणजे सर्व क्वांटम, आयपीआर, 5G, 6G अशा विषयांवरील संशोधन आणि इतर कामांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन असणार आहे, असं मित्तल यांनी यावेळी स्पष्ट केलं.”भारतातील 5G हे जगातील सर्वात वेगवान आहे. 6G तंत्रज्ञानावर देखील आधीपासूनच काम सुरू आहे. भारतात जगातील सर्वात मोठं टेलिकॉम नेटवर्क आहे. सर्वात कमी वेळात स्वदेशी 4G आणि 5G तंत्रज्ञान विकसित करुन देशाने जगाला आश्चर्यचकित केलं आहे.” असं मित्तल यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले, “भारतात आज एक लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. इतर देशांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आणि कोलॅबरेट करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. भारत हा एक विश्वासार्ह सहकारी असल्याचा अनुभव आतापर्यंत जगभरातील कित्येक देशांनी घेतला आहे. यामुळेच 5G असो किंवा 6G असो, याबाबत प्रत्येकाला भारतासोबत मिळून काम करायचं आहे.”
टेलिकॉम सेक्टरमध्ये गुंतवणुकीची संधी
भारत सरकार हे टेलिकॉम सेक्टरमध्ये स्टार्टअप्सना गुंतवणुकीची संधी देत आहे. “ब्रिजिंग ड्रीम्स अँड फंडिंग : लिंकिंग व्हेंचर कॅपिटल” या अभियानाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना स्टार्टअपच्या भविष्याशी जोडलं जाणार आहे. यासाठीच्या बैठक सत्राची सुरूवात मित्तल यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सुमारे 26 स्टार्टअप कंपन्यांनी आपली उत्पादने सादर केली.