ताजी बातमी ऑनलाईन टीम
शहरातील विविध भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र कायम आहे. येथील जवाहरनगर परिसरात तब्बल ५ ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. त्यामध्ये ३ ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला तर तर २ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. याप्रकारामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. सदरची चोरी पाळत ठेवून केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून चोरटे सीसीटिव्ही कैद झाले आहेत. याबाबत शिवाजीनगर पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत घटना स्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की, शहरात बंद घरांचे कुलूप तोडून चोरीच्या घटना वाढत आहेत. तसेच काही भागात चोरटे मंदिरांना लक्ष्य करत असल्याचे दिसत आहे.
मंगळवारी रात्री जवाहरनगर परिसरात तर पाळत ठेवून २ ठिकाणी चोरी आणि ५ ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. यापैकी स्वामी मळ्यातील सुनिल आवळकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून दागिण्यांसह रोकड लंपास केली. त्यानंतर जवाहरनगर परिसरातील यासीन पकाली यांच्या उमंग फोटो स्टुडिओचे कुलूप तोडुन चोरट्यांनी कॅमेरे आणि किंमती साहित्यासह सुमारे २ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. तर त्याच परिसरातील सृष्टी ब्युटी पार्लरमधून २५ हजाराची रोकड लंपास केली आहे.
फोटो स्टुडिओमध्ये चोरी करणारे चोरटे सिसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र एकाच भागात पाळत ठेवून केलेल्या चोरीच्या प्रकारामुळे नागरीकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.