ताजी बातमी ऑनलाईन टीम
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 5 वर्ष सलग देशाचा आर्थिक गाडा हाकरणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पहिल्या महिला ठरणार आहेत. सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांच्या नावावर 5 पूर्ण आणि आजचा अंतरिम अर्थसंकल्प असे एकूण 6 अर्थसंकल्प सादर केल्याची नोंद होईल. सलग सहा वेळा अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम माजी अर्थमंत्री मोरारजी देसाईंच्या नावे आहे. जुलै 2019 पासून सीतारमण यांनी 5 पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. आजच्या भाषणानंतर निर्मला सीतारमण मनमोहन सिंह, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा या सर्वांना मागे टाकतील. या मंत्र्यांनी प्रत्येकी 5 अर्थसंकल्पीय भाषणं केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये निवडणूकीत पूर्ण बहुमत मिळाल्यावर निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थमंत्रालयाची सूत्र सोपवली. तेव्हापासून आज तागायत सीतारमण यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे असं म्हणायला हरकत नाही.
विक्रमाची ही 5 वर्ष सीतारमण यांच्यासाठी सोपी अजिबात नव्हती. कोरोनाच्या सर्वात कठीण आर्थिक परिस्थितीतून सार जग जात असताना भारतासारख्या बड्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्याचे मोठं आव्हान सीतारमण यांच्या कार्यकाळात पेललं. जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत असताना भारताचा विकासदर मात्र 5 टक्क्यांच्या आसपास स्थिरवला. जगभरातल्या अर्थव्यवस्थामध्ये पैशांचे धबधबे येत असताना भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मर्यादीत पण पुरेसा आर्थिक डोस देण्याचा निर्णय सीतारमण यांच्याच कार्यकाळात झालाय. त्याच परिणाम म्हणून अमेरिकेसारखं मोठं महागाईचा आगडोंब भारतात उसळला नाही. दुसरीकडे रशिया युक्रेन आणि इस्राइल-हमास यासारखी दोन युद्धं देखील याच काळात झाली. त्याचाही धक्का जागतिक अर्थव्यवस्थांना बसला. या धक्क्यामधून भारताला सावरण्यातही अर्थमंत्रलायची मोठी भूमिका होती.