इचलकरंजी महापालिकेची वसुली जोरात : दोन दुकान गाळे सील
इचलकरंजी महापालिका मार्च एंड च्या पार्श्वभूमीवर घरफाळा पाणीपट्टी वसुलीसाठी जोरदार यंत्रणा राबवत असून शहरातील नुकताच दोन दुकान गाळे सील करण्यात आली. वारंवार मागणी करुन आणि नोटीसा देऊनही दुकानगाळ्याचे थकीत भाडे न भरल्याने राजाराम स्टेडीयममधील कृष्णा वसंतराव काणेकर व देवाप्पा सुबराव काणेकर यांचे दुकानगाळे महानगरपालिकेने गुरुवारी सील केले.
महानगरपालिका हद्दीतील राजाराम स्टेडीयम इमारतीतील गाळा क्र. ४७ हा कृष्णा काणेकर व टेम्पररी शेडमधील गाळा क्र. २४ हा देवाप्पा काणेकर हे वापरत होते. या दोन्ही गाळेधारकांना महानगरपालिकेने वारंवार थकीत भाडे भरण्यासंदर्भात सूचना देण्यासह नोटीसाही पाठविल्या होत्या. तरीही थकीत भाडे न भरल्याने गुरुवारी महानगरपालिकेने दोन्ही गाळे सील केले.
मिळकत विभागाकडील पथकप्रमुख दीपक खोत, वरिष्ठ लिपिक अनिकेत राजापुरे, किशोर खोत, प्र. मुकादम उत्तम कांबळे, संकेत आवळे यांनी ही कारवाई केली. ज्यांचे भाडे थकीत आहे त्यांनी तातडीने भाडे भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, अन्यथा दुकानगाळे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.