Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरगडहिंग्लज परिसरात निघतोय गांजाचा धूर

गडहिंग्लज परिसरात निघतोय गांजाचा धूर

अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई गुरफटली आहे. पूर्वी हायप्रोफाईल लोक तसेच पुण्या-मुंबईसारख्या शहरी भागात अमली पदार्थांची देवाण-घेवाण व्हायची; पण आता ग्रामीण भागातही अमली पदार्थांची राजरोस विक्री होऊ लागली आहे. अमली पदार्थाचे सर्वात पहिले स्टेशन म्हणून गांजाकडे पाहिले जाते. गांजापासून सुरू झालेले व्यसन पुढे पुढे नवनव्या ड्रग्जमध्ये रूपांतरित होऊन तरुण पिढी अक्षरशः बरबाद होते. गडहिंग्लज तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून गांजाची विक्री वाढली असून, गांजाच्या धुराकडे केलेले दुर्लक्ष नव्या पिढीसाठी महागडे ठरणार आहे.

गडहिंग्लज तालुक्याची रचना कर्नाटकच्या सीमेवर आहे. गोव्यापासून अवघ्या काही अंतरावर तालुका असल्याने या दोन्ही ठिकाणी असलेल्या गांजा विक्रीच्या टोळ्या गडहिंग्लजमध्ये सक्रिय झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांवरून दिसून येत आहे. कर्नाटकातून येणारा गांजा गोव्याला पोहोचविण्यासाठी गडहिंग्लज हेच मध्यवर्ती केंद्र ठरत असून, या ठिकाणी याचे डील होत असल्याचे दिसून येत आहे. यातूनच गडहिंग्लजमधील काही ठराविक तरुण या व्यसनाच्या आधीन गेले असून, पूर्वी काही ग्रॅमवर येणारा गांजा आता किलोवर आला आहे. गांजा सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने एकाच्या नादाला लागून दुसरा तरुणही या गांजाच्या व्यसनात गुरफटत जात असल्याचे दिसून येत आहे.

गडहिंग्लज शहरातील काही ठराविक निर्जन ठिकाणी या तरुणांची टोळकी ठराविक वेळी गांजाच्या नशेत तरंगत असल्याचे चित्र आजही आहे. गांजाकडे पोलिसांसह समाजाने केलेले दुर्लक्ष आगामी काळात मात्र डोकेदुखी ठरणारे आहे. गांजातून येेणारी नशा कमी वाटू लागली की, मग त्याच्या पुढील टप्पा म्हणून विविध प्रकारचे अन्य ड्रग्ज घेण्यास ही मुले मागे-पुढे पाहत नाहीत. अन्य व्यसनांतून मुलांना बाहेर काढणे सोपे असते. मात्र, अमली पदार्थांचे व्यसन सहजासहजी सुटत नसल्याने यात शिरकाव होण्यापूर्वी अटकाव होणे गरजेचे आहे; अन्यथा गडहिंग्लजसारख्या सुसंस्कृत शहरात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात कधी पोहोचेल हे कळणारही नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -