टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. अनुष्का शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. मुलाच्या नावाविषयी देखील अनुष्काने खुलासा केला. अकाय (Akaay) असं नाव चिमुकल्याचं नाव ठेवलं आहे. 15 फेब्रुवारी रोजी अकायने जगात पाऊल ठेवलं. अनुष्काने दिलेल्या खुशखबरीमुळे आता विराट आणि अनुष्काच्या फॅन्सला आनंद गगनात मावेना झालाय. मात्र, आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंती अनुष्काने फॅन्सला केली आहे.काय आहे अनुष्काची पोस्ट?
विपुल आनंदाने आणि आमच्या प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आम्हाला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे अकाय आणि वामिकाच्या लहान भावाचं या जगात स्वागत केलं. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा लाभो. आम्ही तुम्हाला विनंती करतो की यावेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. प्रेम आणि कृतज्ञता. विराट आणि अनुष्का, अशी पोस्ट अनुष्का शर्माने केली आहे.
अनुष्काने 11 जानेवारी 2021 रोजी वामिकाला जन्म दिला होता. वामिकाच्या जन्मानंतर विराटने अनेकवेळा कुंटूबियासोबत टाईम्स स्पेंड केला आहे. आताही सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत विराटने सहभान नोंदवला नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका देखील झाली होती. मात्र, बीसीसीआयने विराटची सुट्टी मंजूर केली होती. अशातच आता विराटने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
दरम्यान, विराट कोहलीचा खास मित्र आणि साऊथ अफ्रिकेचा माजी स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सने याबाबत खुलासा केला होता. मात्र, त्याने नंतर बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं. अशातच आता एबी डिव्हिलियर्सचं खरं बोलला होता, हे स्पष्ट झालं आहे. वर्ल्ड कपवेळी जेव्हा अनुष्का सामना पाहण्यासाठी येत होती, तेव्हापासून अनुष्का गरोदर असल्याची चर्चा होती. आता खुद्द अनुष्काने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे.