आपल्या देशात सर्वत्र क्रिकेटचे फॅन्स आहेत. क्रिकेट खेळाचं फॅड मोठ्या प्रमाणात असलेलं पाहायला मिळतं. मात्र कोल्हापूरमधील एका सुपुत्राने वेगळ्या खेळात गगनभरारी घेत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. करवीर तालुक्यातील दर्शन पाटील याची ऑस्ट्रियामधील SV Gmunden या फुटबॉल क्लबमध्ये निवड झाली आहे.
त्यामुळे येत्या युरोपियन लीगमध्ये महाराष्ट्राकडून खेळणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरणार आहे. दर्शन याच्यासह नेदरलँडमधील वर्मन याचीसुद्धा या क्लबकडून खेळण्यासाठी निवड झाली आहे.देवकर पानंद इथे राहणाऱ्या दर्शन याने आपल्या मामाकडून (बिपीन देवणे) फुटबॉलची प्रेरणा घेतली. पाचवीमध्ये त्याने कोल्हापूरमधील महाराष्ट्र हायस्कूल येथे प्रवेश घेतला.
कारण या शाळेमध्ये फुटबॉलची क्रेज आहे. त्यानंतर दर्शन याने पाचवीपासून फुटलबॉलचा सराव करायला सुरूवात केली. दोन्ही वर्षे शाळेकडून खेळला, चांगल्या प्रदर्शनानंतर तो आठवीत असताना १४ वर्षाखालील दिल्लीमध्ये झालेल्या नॅशनल स्पर्धेत खेळला. दुसरं नॅशनल हे रिलायन्स तर भोपाळमध्ये झालेल्या १९ वर्षाखालील नॅशनल स्पर्धेत तो खेळला. वडिलांनी फुटबॉलमध्ये इतका स्कोप नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याला फुटबॉलसोबत अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितलं होतं.
…अन् दर्शनचं नशीब पालटलं
दर्शन पाटीलला त्याचे कॉलेजचे कोच प्रदीप सोळोखे आणि धीरज मिश्रा यांचा फोन आला. त्यांनीच महाराष्ट्रात अशी ट्रायलमध्ये होणार असल्याची माहिती दिली. डिसेंबर महिन्यात पुण्यातील बालेवाडी येथे ही ट्रायल झाली होती. या ट्रायलसाठी महाराष्ट्रभरातून पन्नासपेक्षा जास्त खेळाडू आले होते. त्यातील पाच मुलांची निवड झाली होती आणि या पाचमधून दर्शनला सिलेक्ट करण्यात आलं.दर्शन काय म्हणाला?
ट्रायल झाल्यावर माझा नाव पत्ता घेतला त्यावेळी मला काही माहित नव्हतं की माझी निवड झाली आहे की नाही?. आमच्या दोन्ही कोचने मला तुझी निवड झाल्याचं सांगितलं होतं. मी ट्रायल झाल्यापासून कधी फोन येतो याची वाट पाहत होतो. मी मोठ्या उत्साहात माझ पासपोर्टही काढलं पण जवळपास दीड महिना झाला पण फोन काही आला नाही. मला तर वाटलं फेक आहे, अचानक मला परवा कोच आणि कौशिक सरांचा फोन आला त्यांनी मला मुंबईत यायला सांगितलं. आज मला वानखेडे स्टेडियममध्ये आल्यावर जर्सी देण्यात आली, असं दर्शन पाटील याने सांगितलं.
दरम्यान, या कार्यक्रमाला कर्नाटक स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष डॉ.पी.व्ही. शेट्टी, SV Gmunden या फुटबॉल क्लबचे अध्यक्ष गेर्हाल्ड रिडल, दक्षिण-पूर्व आशिया आणि भारत RIESPO वरिष्ठ सल्लागार कौशिक मौलिक आणि PRO10 चे संचालक राजेश मालदे उपस्थित होते.