परजिल्ह्यातून सांगली, मिरजेत येऊन प्रवाशांचे दागिने, पर्स लांबवणाऱ्या विठाबाई नितीन चौगुले (वय ५०, आळते माळ, ता. हातकणंगले), नगीना सागर चौगुले (वय ४०, गोसावी गल्ली, हातकणंगले), सावित्री सैदू लोंढे (वय ५०, रा.कागवाड, ता. अथणी) या तिघींना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. तिघींकडून तीन गुन्हे उघडकीस आणत दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाला बसस्थानकावर दागिने, पैसे चोरणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथक चौकशी करत असताना मिरज बसस्थानकात चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी तीन महिला छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या प्रेक्षक गॅलरीत बसल्याची माहिती मिळाली.
महिला पोलिसांना घेऊन पथकाने सापळा रचून तिघींना ताब्यात घेतले. महिला पोलिसांच्या मदतीने तिघींची झडती घेतली. तेव्हा रोख ५० हजार रुपये आणि दीड लाखाचे सोन्याचे दागिने असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत विठाबाई हीने मिरज स्थानकावर गर्दीमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधील पर्स चोरी केल्या होत्या. त्यातील दागिने व रोकड असल्याचे सांगितले.
तिघींनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे हद्दीत तीन चोऱ्या केल्याची कबुली दिली. तिघींना गांधी चौक पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.पोलिस कर्मचारी सपना गराडे, शुभांगी मुळीक, आमसिद्ध खोत, अमोल लोहार, अमोल ऐदाळे, राजू शिरोळकर, संकेत मगदूम, बाबासाहेब माने, सोमनाथ गुंडे, सोमनाथ पतंगे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.
तिघी रेकॉर्डवरील गुन्हेगार
अटक केलेल्या विठाबाई चौगुले, नगीणा चौगुले, सावित्री लोंढे या तिघी महिला पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात स्पष्ट झाले. परजिल्ह्यातून येऊन त्या चोऱ्या करतात.