मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासाठी डॉक्टरांचे पथक आंतरवाली सराटी येथे पोहचले आहे. काल शुक्रवारी रात्री अचानकपणे मनोज जरांगे पाटील याना त्रास सुरु झाला होता. त्यानंतर लगेचच रात्री त्यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. त्यात कुठलाही धोका नसल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आता आंतरवालीतच जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. ऍसिडिटी वाढल्यामुळे छातीत कळ आली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर प्रकृती ठीक झाल्याने शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर ते आंतरवाली सराटी येथे दाखल झाले. परंतु रात्री उशिरा अचानकपणे त्यांच्या छातीत दुखू लागल्याने पुन्हा एकदा जीनगरच्या डॉक्टरांना बोलवण्यात आलं. डॉक्टर तातडीने आंतरवाली सराटी येथे दाखल झाले आणि जरांगे यांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांचा एसीजी (ECG) काढण्यात आला. मात्र त्यांना कुठलाही धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या ३-४ महिन्यांपासून उपोषण करत आहेत. महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आल्यानंतर सुद्धा जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठा समाजाच्या विनंतीनंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरी साखळी उपोषण सुरुच राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. पुढील काही दिवस सरकारच्या भुमिकेकडे फक्त लक्ष ठेवा, त्यानंतर आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू असे अवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे.