सातारा जिल्ह्यातून गेलेल्या पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्ग खड्डयांच्या साम्राज्यात अडकला आहे. सातारा- पुणे दरम्यान या महामार्गावर पावलोपावली मोठमोठे खड्डे पडल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
सातारा- पुणे दरम्यानच्या महामार्गावरून वाहन धारकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याने यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
त्यातच आता महामार्गाच्या उड्डाणपूलांवर झाडे झुडपे वाढल्याने उड्डाण पूलांना धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून प्रवाशी वर्गातून संताप वक्त होत आहे.
याशिवाय सातारा- पुणे रस्तादरम्यान पडलेल्या खड्यात दुषित पाणी साचल्याने दुर्गधी पसरलेली आहे. यामुळे प्रशासनाने लवकरात- लवकर यांची माहिती घेवून रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांकडून होत आहे. परिसरातील नागरिकांनी या रस्त्यावर अनेक वेळा खड्यामुळे अपघात होत असल्याने देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे.