देशातील सर्वांत मोठा युट्यूबर अजय नागर उर्फ कॅरी मिनाटीला सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातंय. कारण हे प्रकरण क्रिकेटर विराट कोहलीशी संबंधित आहे. कॅरी मिनाटीने नुकत्याच त्याच्या एका व्हिडीओमध्ये विराटची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आरसीबीचे (RCB) चाहते त्याच्या विरोधात उभे राहिले. ट्विटरवर ‘Shame on Carryminati’ ट्रेंड होऊ लागलं. या ट्रोलिंगनंतर अखेर युट्यूबरला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. एक्सवर (ट्विटर) कॅरी मिनाटीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कॅरी म्हणतोय, “विराटने यासाठी गोड खाणं बंद केलंय कारण त्याला कधीच सेलिब्रेट करण्याची संधी मिळत नाही. रोहितकडे पहा, जेव्हा माणूस जिंकतो तेव्हा त्याला डाएट करण्याची गरजच पडत नाही. विराट तू ऐकतोयस ना.” या व्हिडीओवरून विराट आणि RCB चे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी कॅरी मिनाटीला ट्रोल करत त्याला माफी मागण्यास सांगितलं आहे. अखेर वाढती ट्रोलिंग पाहता कॅरी मिनाटीने पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे.कॅरी मिनाटीचं स्पष्टीकरण-
‘मी आताच ट्विटर पाहिलं तर समजलं की लोकांचा थोडा गैरसमज झाला आहे. मी एक शो करतोय आणि त्यामधील एका स्किटवरून लोक रागावले आहेत. मात्र संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी कृपया तो स्किट पूर्ण पहा. मी खऱ्या आयुष्यात विराट कोहलीचा अनादर का करेन? तो फक्त एक स्किट होता आणि त्याचा उद्देश कोणाचाही अनादर करण्याचा नव्हता. आम्ही काही भूमिका साकारत होतो आणि त्यात मी RCB च्या पॅरडीची भूमिका साकारतोय. यापेक्षा अधिक काहीच नाही. त्याच स्किटमधील माझा हा क्लिप इथे शेअर करतोय, ज्यामध्ये मी त्याचा चाहता आहे.
बाकी तुमची मर्जी, तुम्ही प्रेक्षक आहात, मला तुमच्याशी जिंकायचं नाहीये’, असं त्याने स्पष्ट केलंय.कॅरीमिनाटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या युट्यूबरचं खरं नाव अजय नागर आहे. तो युट्यूबर, स्ट्रीमर आणि रॅपरसुद्धा आहे. इतरांना रोस्ट करणारे व्हिडीओ, कॉमेडी स्किट्स यांसाठी तो ओळखला जातो. याआधीही कॅरीमिनाटीचे काही व्हिडीओ वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. नियम मोडल्याने युट्यूबने त्याचे व्हिडीओ काढून टाकले होते.