इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधी ठोस भूमिका घेतलेली नाही. त्याचबरोबर नेतेमंडळींनी केवळ आश्वासनांशिवाय काहीच केलेले नाही. त्यामुळे शुध्द व मुबलक पाण्यासाठी पाणी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांना खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी उभे करणार असल्याची माहिती इचलकरंजीच्या लेकी (महिला नारी शक्ती) यांच्यावतीने पत्रकार बैठकीत दिली.
त्या म्हणाल्या, प्रदीर्घ काळापासून इचलकरंजीकरांना शुध्द व मुबलक पाण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यासाठी प्रसंगी आमरण उपोषण, आंदोलने करण्यात आली. परंतु कोणीच नेतेमंडळी या प्रश्नाची गांभिर्याने दखल घेत नसल्याचे दिसून येते. सध्या सुळकूड पाणी योजनेसाठी आंदोलन छेडले जात आहे. त्यामध्ये रमेश पाटील यांनी पाण्यासाठी एकदिवसीय उपोषण केले. तसेच सावित्रीच्या लेकी संघटनेच्या वतीने महिलांनी केलेल्या आमरण उपोषणाची दखल घेत मंत्रीमंडळात बैठक झाली. पण अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही.
महानगरपालिका वर्षातून अवधे ९० दिवस पाणी पुरवते. परंतु बिल मात्र ३६५ दिवसांचे घेते. या महत्वाच्या नागरी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी म्हणून तळमळ असणाऱ्या रमेश पाटील यांना लोकसभा निवडणूकीत सर्वच इचलकरंजीकरांना पाठबळ देऊन पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विद्या जाधव, रतन कवडे, जयश्री जाधव, राजश्री जाधव, वैशाली जाधव, पद्मावती मोरे व सुषमा साळुंखे यांनी केले आहे.