Thursday, April 25, 2024
Homeइचलकरंजीकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा 31 व्या हंगामाची सांगता

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा 31 व्या हंगामाची सांगता

इचलकरंजी :
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन 2023-24 हा 31 वा ऊस गाळप हंगाम संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला. या हंगामामध्ये 120 दिवसात 16 लाख 18 हजार 306 मेट्रीक टन इतके ऊस गाळप केले.

हंगाम सांगता प्रित्यर्थ कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सन्मती चौगुले या उभयतांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. त्याचबरोबर हंगामात उत्पादित  साखर पोत्यांचे पूजनही करण्यात आले. 31 व्या ऊस गाळप हंगामासाठी 11 ऑक्टोबर 2023 रोजी बॉयलर अग्निप्रदीपन होऊन 25 नोव्हेंबर 2023 रोजी ऊस गाळपास सुरुवात झाली. या हंगामात कारखान्याकडे 16450 हेक्टर इतका ऊस गाळपासाठी आला.

चालू हंगामामध्ये हेक्टरी सरासरी 98 मे.टन इतके ऊस उत्पादन मिळाले, मागील हंगामात ते 95 मे. टन होते.

गाळप हंगाम 2023-24 साठी ऊस विकास योजनेतून खते, बि-बियाणे, तणनाशके, सुक्ष्म अन्नद्रव्ये, ठिबक सिंचन, क्षारपड जमीन सुधारणा यासाठी 10 कोटी 43 लाख 84 हजार इतक्या रकमेचे वाटप केले. त्यामध्ये 66 लाख 72 हजार इतके अनुदान दिलेले आहे. या हंगामाकरीता तोडणी वाहतूकीसाठी 1 ट्रक, 412 ट्रॅक्टर, 493 ट्रॅक्टर टायरगाडी व 292 बैलगाडी आणि 53 ऊस तोडणी यंत्रे प्रत्यक्षात कामावर हजर झाले. यामुळे कारखान्यास ऊस पुरवठा होण्यास मदत झाली. ऊस उत्पादक सभासद व शेतकर्‍यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य केल्याबद्दल शेतकरी-सभासद, तोडणी वाहतूकदार व मजूर आणि अधिकारी-कर्मचारी कामगार यांचे कारखाना व्यवस्थापनाने आभार मानले.

पुढील हंगामामध्ये या वषर्षापेक्षाही अधिक ऊस गाळप होण्यासाठी सर्व सभासद व शेतकर्‍यांनी आपला सर्व ऊस नोंद देऊन गाळपासाठी पाठवावा असे आवाहनही संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक सर्वश्री आण्णासाहेब गोटखिंडे, आदगोंडा पाटील, सौ. कमल पाटील, सुकुमार किणींगे, सूरज बेडगे, गौतम इंगळे, शितल आमण्णावर, सुमेरु पाटील, दादासो सांगावे, माजी चेअरमन उत्तम आवाडे, माजी संचालक धनंजय मगदूम, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, कामगार प्रतिनिधी सर्जेराव हळदकर तसेच इतर मान्यवर व कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -