एस.टी. आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. विनायक मट्टी कली असे मृताचे नाव असून कृष्णात रजपूत याचेवर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत एसटी चालक सुनील गवळी याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
इचलकरंजी येथील जवाहर नगर मध्ये राहणारे विनायक निलकंठ मट्टीकल्ली (वय 40, रा. हनुमाननगर गल्ली नं. 4 इचल.) आणि कृष्णात धोंडीबा रजपुत ( वय 55, रा. कोरवी गल्ली, जवारहरनगर) . हे आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शाहु पुतळ्याकडून एएससी महाविद्यालयाच्या दिशेनं जात होते.
ते मुख्यमार्गावरून महाविद्यालयासमोरील पेट्रोल पंपाकडं वळण घेत असताना कोल्हापूरहून इचलकरंजीकडं येणार्या एस.टी.नं त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात एस.टी. विनायकच्या डोक्यावरून गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णात रजपुत हे गंभीर जखमी झाले. नागरीकांनी 108 रुग्णवाहिका आणि पोलिसांशी संपर्क साधला. मात्र रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्यानं पोलीस पंचनाम्यानंतर मालवाहु टेम्पोतून नागरीकांनी दोघांना आयजीएम रुग्णालयात दाखल केलं.
कृष्णात रजपुत यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात हलवलं आहे. घटनास्थळी आणि आयजीएम रुग्णालयात नागरीक आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान विनायकच्या विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एस.टी. चालक सुनिल गवळी याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.