वधू-वर सूचक संकेतस्थळावरून अर्थात मॅट्रिमोनिअल साईटवरून अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या आधुनिक लखोबा लोखंडेला पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याला पायधुनी पोलिसांनी हैदराबाद येथून बेड्या ठोकल्या असून त्याने 20 हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. इम्रान अली असे आरोपीचे नाव असल्याचे माहिती समोर आली आहे. त्याने पायधुनी परिसरातील 42 वर्षीय महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. त्याप्रकरणी त्याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल होता. अखेर पोलिसांनी त्याचा पर्दाफाश करत त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीने एक -दोन नव्हे तर देशभरातील 20 महिलांना फसवल्याचा संशय असून त्यामध्ये मुंबईतील 10 ते 12 महिलांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. तसेच राज्यातील परभणी, धुळे व सोलापूर येथील महिलांचा समावेश असल्याी माहिती समोर आली आहे.
माझ्या आई-वडिलांचे निधन झाले असून मी मावशीसह हैदराबादमध्ये राहतो. दोन्ही भाऊ शिक्षणासाठी कॅनडामध्ये असल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी दोघांनीही एकमेकांना पसंत केले. त्यानंतर १० मे २०२३ रोजी इम्रानने अचानक फोन केला. त्यावेळी मित्रांना आपल्याबाबत सांगितल्यावर त्यांना तुझ्याकडून पार्टी हवी आहे, असे सांगून इम्रानने तक्रारदार महिलेनकडू एक हजार रुपये ऑनलाईन मागवले.
तर काही दिवसांनी तक्रारदार महिलेने आरोपीला, मुंबईत येऊन आईची भेट घेण्यास सांगितले. तेव्हाही आरोपीने मुंबईत येण्यासाठी महिलेकडून 10 हजार रुपये मागितले. त्यानंतर एक भूखंड खरेदी करण्याच्या बहाण्याने तिच्याकडू लाखो रुपये उकळले. आणखी काही ना काही बहाण्याने त्याने तिच्याकडून आणखी रक्कम उकळत राहिला. तक्रारदार महिलेने आरोपीला एकूण 21 लाख 73 हजार रुपये दिले. मात्र बरेच दिवस उलटूनही आरोपीने हे पैसे परत केली नाही, त्याने तिची आर्थिक फसवणूक केली.
अखेर त्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पायधुनी पोलिसांनी आरोपी इम्रान याला हैदराबादमधून अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असून त्यात हत्येच्या गुन्ह्याचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीचे पूर्वीच लग्न झालेले असून त्याच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा त्याच्याविरोधात दाखल केला होता, अशी माहिती देखील समोर आली.