देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप्रणित (BJP) आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे.
राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची (MVA Alliance) 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024)कायम राहिला तर महायुतीची सत्ता जाणे अटळ आहे. येत्या चार महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे जनमताची हीच हवा कायम राहिल्यास महाविकास आघाडीला 150 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांवर विजय मिळू शकतो. तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित मजल 125 जागांपर्यंत जाऊ शकते. महाराष्ट्रात विधानसभेतील बहुमताचा आकडा 145 इतका आहे. त्यामुळे 150 जागांवर विजय मिळाल्यास आगामी निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी सहजपणे सत्तेत येऊ शकते, असे लोकसभेच्या आकडेवारीवरुन दिसत आहे.
एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यानुसार राज्यातील लोकसभेच्या 48 जागांची 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागणी होते. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत 30 जागा जिंकल्या आहेत. या 30 जागांवरील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य मिळाले होते. तर महायुतीने लोकसभेच्या 17 जागांवर विजय मिळवला. सांगलीच्या जागेवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला होता.
महाविकास आघाडीत इनकमिंग वाढणार
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत इनकमिंग वाढण्याची शक्यता आहे. अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघांमधील आमदार धास्तावले आहेत. विशेषत: अजित पवार गट आणि शिंदे गटातील अस्वस्थ आमदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गोटात परतण्याची शक्यता आहे. अजितदादा गटाच्या 10 आमदारांनी सुप्रिया सुळे यांना बारामतीमधील विजयानंतर अभिनंदनाचे मेसेज केल्याची चर्चा आहे.