तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही येत्या काळात आरामात यूपीआय पेमेंट करू शकाल. कारण, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लवकरच यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांसाठी क्रेडिट लाइन सुविधा सुरू करणार आहे. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी यूपीआयवरील क्रेडिट लाइन जाहीर करण्यात आली होती. ही सुविधा सुरू झाल्यानंतर तुमचं यूपीआय खातं क्रेडिट कार्डप्रमाणे काम करेल. खरं तर, यूपीआयवरील क्रेडिट लाइन म्हणजे बँक खातं वापरणाऱ्या ग्राहकासाठी प्री-अप्रूव्ह्ड लोन आहे. हे बँक खातं ग्राहकांच्या यूपीआय खात्यांशी जोडलेले असेल.
बँका आकारणार निश्चित व्याज
प्रत्येक ग्राहकाला त्याच्या सिबिल स्कोअरनुसार क्रेडिट लाइन मिळेल, असं संस्थेचं म्हणणं आहे. त्याचा वापर व्यापाऱ्यांकडेच करता येईल. त्या बदल्यात बँक निश्चित व्याजही आकारणार आहे. यासंदर्भात संस्थेनं अनेक खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांशी चर्चा केली आहे. आतापर्यंत आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, पीएनबी, इंडियन बँक आणि अॅक्सिस बँक यांनी त्यांच्यात सामील होण्यास सहमती दर्शविली आहे.
दुकानदारांनाही होणार फायदा
या सुविधेचा ग्राहकांसोबतच दुकानदारांनाही फायदा होणार आहे. क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून २००० रुपयांच्या वर पेमेंट केल्यास दुकानदारांना २ टक्क्यांपेक्षा अधिक चार्ज द्यावा लागतो. यूपीआय क्रेडिट लाईन मिळाल्यानंतर असं शुल्क द्यावं लागणार नाही. दरम्यान, क्रेडिट कार्डावर खरेदी केल्यास निश्चित कालावधीसाठी तुम्हाला व्याज द्यावं लागत नाही. परंतु यूपीआय क्रेडिट लाईनचा वापर केल्यास त्यावर व्याज द्यावं लागेल. हे एकप्रकारे ओव्हरड्राफ्ट सुविधेप्रमाणे काम करेल.
१.२ टक्के इंटरचेंज लागू शकतं
प्रत्येक व्यवहारावर व्यापारी क्रेडिट इश्यूअरला कमिशन देतो, म्हणजेच इंटरचेंज. हे मर्चंट डिस्काऊंट रेटच्या ९० टक्के आहे. व्यवहार अधिक सोयीस्कर व्हावा म्हणून व्यापारी हे शुल्क बँकांना देतात. कॉर्पोरेशन लवकरच यूपीआय क्रेडिट लाइनसाठी १.२ टक्के इंटरचेंजची घोषणा करू शकते. याबाबतचे परिपत्रक लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. यूपीआय कमाईच्या वाट्यासाठी अॅप्स आणि बँकांशी चर्चा करत आहे.