Monday, November 11, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई आणि रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई आणि रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईकरांसाठी पुढील तीन तास महत्वाचे आहेत. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे मुंबईतील नागरिकांनी काळजी घ्यावी असे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात 8 जुलै रोजी मुंबईत अति मुसळधार पाऊस कोसळला होता. आता पुन्हा हा विकेण्ड देखील हवामान विभागाने काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

 

मुंबईत कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील लोकल ट्रेन 8 जुलैच्या पावसात मध्य रेल्वेच्या कसारा-खडवली परिसरात नदीला पुर आल्याने वाहतूकीचे तीन तेरा वाजले होते. यावेळी नवीनच ठिकाणी पाणी रुळांवर आल्याने मध्य रेल्वेचे अधिकारी चक्रावले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर येथे नदीला पुर आल्याने पुरात अडकली होती. त्यावेळी नेव्हीला मदतीसाठी पाचारण करावे लागले होते. यंदा देखील लांबपल्ल्याची मुंबईत येणारी गाडी रखडली होती. त्यामुळे विधीमंडळ अधिवेशनासाठी मुंबईत येणारे लोकप्रतिनिधी अडकून पडले होते.

 

भांडुप परिसरात यंदा नवा ब्लॅक स्पॉट

यंदा भांडुप परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने रुळांवर पाणी आल्याने लोकल खोळबंल्या होत्या. या ठिकाणी कधी पाणी साचल्याचा इतिहास नव्हता. परंतू येथील नालाचे रुंदीकरण पालिकेने रेल्वेला न कळविता केल्याने या ठिकाणी यंदा अधिक पाणी साचल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात नाला रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरु होते. या कामासाठी पालिकेने रेल्वे शेजारचा रस्ता देखील प्रवाशांसाठी बंद केला होता. तरीही मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कसे कळले नाही असा सवाल नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नसल्यानेच मुंबईकरांना याचा परिणाम भोगावा लागल्याचे म्हटले जात आहे.

 

लोकल 20 मिनिटे उशीराने

मुंबईतील पावसाने दृश्यमानता कमी झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या लोकल 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. कल्याण ते सीएसएमटी लोकल 13 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. गेल्या दोन तासाच्या मुसळधार पावसामुळे कल्याण शिवाजी चौकातले गुडघाभर पाणी साचले आहे. कल्याण -डोंबिवलीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. सुदैवाने अधूनमधून पावसाचा जोर कमी होत असल्याने सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे. मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

नंदूरबारमध्ये पावसाला सुरुवात, बळीराजा सुखावला

नंदूरबार जिल्ह्यात सकाळपासून सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सकाळ पासून सर्वत्र काळोख दाटला असून पावसाने ही हजेरी लावली आहे.पावसाला मोठा जोर नसला तरी सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू असून अधून मधून मोठी सर हजेरी लावत आहेत.जिल्ह्यात चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट असून प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील पावसामुळे शेती कामांना आणखी वेग येणार आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचे काम मंदावले होते. मात्र आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली असल्याने खरीप हंगामाच्या पिकांना फायदा होणार. परंतु जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने धरण क्षेत्रांमध्ये अल्पसा पाणीसाठा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -